कल आज और कल, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत – पंढरपूरचे विठूराया

असं म्हणतात की काळ बदलला की सर्व काही बदलते. पण मला वाटते याला काही गोष्टी अपवाद असू शकतात, आणि या अपवादांपैकीच एक म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूराया प्रती भाविकांची श्रद्धा आणि भाव. गेल्या अनेक शतकांपासून पंढरपूरचा हा विठूराया अनेक पिढ्यांचं दैवत राहिलेलं आहे. याला आजची डिजिटल, फाईव जी, हाय टेक जनरेशन देखील अपवाद नाही. गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखो भाविक लोकआषाढी वारीला विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. यात आजची पिढी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असते. आपण उगाच नव्या पिढीला दोष देत असतो की ही पिढी फास्ट आहे, आपल्या परंपरांपासून दूर जात आहे. परंतु काळाप्रमाणे ही पिढी उत्सवाचे स्वरूप थोडेफार बदलून त्यात हिरीरीने सहभागी होत आहे.

 

*आषाढी एकादशीचे महत्त्व आताच्या पिढीच्या परिप्रेक्षातून -*

 

असं म्हणतात की आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात आजची रील जनरेशन देखील हिरीरीने सहभागी होत असते. उपवास असो किंवा वारी त्याचे व्हिडिओ किंवा वा रील बनवून सोशल मिडीयावर शेअर करण्यात या पिढीला काहीच वावग नाही आणि त्यात असू नये. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. गेल्या अनेक पिढ्यांनी ही परंपरा पाळली आहे आणि आताची जनरेशन देखील त्यांच्या पद्धतीने त्याचे जतन करीत आहे.

 

*आषाढी एकादशी आख्यायिका -*

 

आजची जनरेशन आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट तर करत आहे पण या पिढीला या महान परंपरेचा इतिहास माहित असणे देखील महत्वाचे आहे म्हणून येथे याबाबतची माहिती देत आहोत. एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

 

तर काल, आज आणि उद्या देखील ही महान परंपरा अबाधित राहणार यात अजिबात शंका नाही. येणाऱ्या पिढीला त्यांच्या प्रमाणे कनेक्ट होऊ देणे, व्यक्ती होऊ देणे यातून सुवर्णमध्य साधत या उत्सवाचे, परंपरेचे महात्म्य जपूया या अपेक्षेसह आपणास विठूराया आनंद आणि आरोग्य व समृद्धी देवो हीच शुभेच्छा!

 

हेमंतकुमार आ नेहतेसर

सहशिक्षक ज्ञानदीप विघामंदीर मुंबा