रांची:पाचव्या जागतीक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी २१ रोजी ४० हजार लोकांसह झारखंडची राजधानी रांची येथे योगसाधना केली. प्रभात तारा मैदानावर योगसाधन आकारण्यात आली. यंदाच्या योगदिनाच्या प्रमुख कार्यक्रमासाठी ही जागा निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, योगसाधनेची जागा ही प्रांत, वैयक्तिक श्रद्धा यासर्वांच्या वर आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगसाधना ही भारताची प्राचीन आणि आधुनिक पद्धती आहे. ती सातत्याने विकसीत होत असून अनेक शतकांपासून योगसाधनेचे सार टिकून आहे. योग सुदृढ शरीर, स्थिर मन आणि एकतेचा आत्मा असून आपल्या ज्ञान, कर्म आणि भक्तीचे ते नेमके मिश्रण आहे. आजार टाळण्यासाठी योगसाधनेला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा बनवण्याकरीता सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी जनतेला योगसाधनेला समाजाच्या सर्व घटकांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले. योगसाधना शहरं, गावं, आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचायला हवी. कारण, योग प्रांत, श्रद्धा आणि इतर सर्व गोष्टींच्या वर आहे. योगसाधना ही शांतता आणि समृद्धीसाठी गरजेची असून संपूर्ण जगाने हे आत्मसात करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.