नवीन विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच रस्सीखेच
राजीनाम्यासाठी सत्ताधार्यांना ‘मॅनेज’ची चर्चा, की अन्य कारण?
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा शनिवारी महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला आहे. नवीन विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून, अनेकांनी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षांत पाच ज्येष्ठ सदस्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी देण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता. त्यानुसार, बहल यांनी राजीनामा दिला असल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले. तथापि, बहल यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक महिना 18 दिवसांचा कालावधी लोटला होता. तसेच, बहल हे सत्ताधार्यांशी ‘मॅनेज’ असल्याची चर्चाही राष्ट्रवादीत दबक्या आवाजात होत होती. त्यामुळे या राजीनाम्यासाठी नेमके काय कारण असावे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता.
राष्ट्रवादीचे नेतृत्व बहल यांच्यावर नाराज?
मागील वर्षी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकाची सत्ता अक्षरशः खेचून आणली होती. तब्बल 15 वर्षे महापालिकेवर असलेली सत्ता संपुष्टात आल्यानंतर आणि महापालिकेत भाजपकडे पाशवी बहुमत असल्याने आक्रमक विरोधी पक्षनेता देण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, बहल यांच्यावर सत्ताधार्यांसोबत मॅनेज झाल्याचे आरोप दबक्या आवाजात झाले. पक्षाच्या अनेक महत्वाच्या आंदोलन व कार्यक्रमांनादेखील बहल यांनी दांडी मारल्याचे आढळून आले होते. वास्तविक पाहाता, या पदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना काटे, दत्ता साने, अजित गव्हाणे, मंगला कदम यांच्यासारखे आक्रमक नगरसेवक इच्छूक होते. त्यांच्याऐवजी बहल यांच्यावर विश्वास ठेवून पवारांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली होती. तथापि, बहल यांना या पदावर काम करताना आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे पवारांसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज होते.
आता मंगला कदम, दत्ताकाका साने की नाना काटे?
दरम्यान, वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले, की पाच वर्षात पाच जणांना संधी देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार, 17 मार्चरोजीच योगेश बहल यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. आता या पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, दत्ताकाका साने, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्यासह इतरही काही आक्रमक नगरसेवक इच्छुक आहेत. यापैकी काही जणांनी बहल यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटविण्याबाबत अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांच्याकडेही आग्रह धरला होता. मागील महिनाभरापासून बहल हटावची जोरदार कुजबूज मोहीमही राष्ट्रवादीत सुरु झाली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते बदलाचे वारे जोरात वाहू लागल्याची कुणकुण लागताच योगेश बहल यांनी राजीनामा दिला असल्याची माहितीही सूत्राने दिली आहे. महापौर नितीन काळजे यांच्याकडे बहल यांनी राजीनामा सुपूर्त केला असून, महापौरांनी अद्याप तो मंजूर केलेला नाही. सोमवारनंतर या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे.
सोमवारनंतर राजीनाम्यावर निर्णय!
दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून महापौर नितीन काळजे हे योगेश बहल यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत. शनिवारी बहल यांचा राजीनामा महापौरांना मिळाला होता. त्यावर सोमवारनंतर निर्णय होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षनेता हा पक्षाचा गटनेता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन गटनेता नियुक्त करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचे विभागीय आयुक्तांकडे नामंकन दाखल होईल, अशी प्रशासकीय माहितीही देण्यात आली. त्यामुळे अजित पवार नवीन विरोधी पक्षनेता म्हणून कुणाचे नाव सूचवितात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव केल्याने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीचे 37 नगरसेवक निवडून आले तर भाजपचे 77 नगरसेवक निवडून आलेले आहेत.