लखनौ-सत्तेत आल्यापासून शहरांची नावे बदलणाऱ्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आता स्टेडियमचे नाव बदलले आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या ‘इकाना’ स्टेडियमवर होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच या स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.
सामना सुरू होण्याच्या एका रात्री आधीच योगी सरकारने इकाना स्टेडियमचे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे. त्यामुळे आता ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम’ या नावाने हे स्टेडियम ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाला उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनीही तातडीने मंजुरी दिली आहे. एका पत्रकाद्वारे उत्तर प्रदेश सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, आज सकाळी अधिकृतपणे योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत स्टेडियमचे नाव बदलण्यात आले.
तब्बल 24 वर्षांनंतर लखनौमध्ये सामना होत आहे. नव्याने बांधलेल्या लखनौमधील या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच सामना होत असल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल, त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या खेळपट्टीवर खेळण्याचा दोन्ही संघांना अनुभव नसला तरी या सामन्यातही यजमानांचे वर्चस्व असेल, अशी अपेक्षा आहे.