तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था शासन करणार आहे. ‘व्याज कसे द्यायचे’ या चिंतेतून तुमची मुक्ती होऊ शकते. त्यासाठी आपण इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी. या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यावा. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो.
इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लक्ष रूपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा वितरीत केली जाते. यामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होवून त्यांचे करीअर घडविण्यास लाभप्रद ठरते त्यासोबतच राज्यांतर्गत व देशांतर्गत अभासक्रमांसाठी महत्तम 10 लक्ष रुपयांपर्यंत रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत करण्यात येतो.
योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती
अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रूपयांपर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.