शिक्षणसेवकाचा कार्यकाळ पूर्ण करूनही तरुण नोकरीपासून वंचित

0

मांडळच्या आदर्श हायस्कुलमधील प्रकार

जळगाव: माध्यमिक शाळेत शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शासन नियमानुसार शिक्षणसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण करून देखील एक उपशिक्षक अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. संदीप प्रल्हाद शिरसाठ असे उपशिक्षकाचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी आहेत. संदीप शिरसाठ यांच्या शिक्षणसेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता देण्याबाबत हरकत नसल्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी वर्षभरापूर्वी दिले आहेत. मात्र, जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीस अद्यापही मान्यता दिलेली नाही. मांडळच्या शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित आदर्श हायस्कुलमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

आदर्श हायस्कुलमध्ये एचएससी डीएड शैक्षणिक पात्रता असलेले संदीप शिरसाठ यांची मुलाखतीद्वारे नियुक्ती झाली. 5 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांना संस्थेने रितसर नियुक्ती पत्र देखील दिले होते. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाला मान्यता दिलीच नाही. त्यामुळे त्यांनी थेट शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली. उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी वस्तुस्थिती लक्षात घेत शिरसाठ यांच्या शिक्षणसेवक पदास वैयक्तिक मान्यता देण्यास काहीएक हरकत नसल्याचे आदेश दिले. मात्र, शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.

न्यायासाठी लढा

न्याय मिळावा म्हणून संदीप शिरसाठ यांचा त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब शिरसाठ यांच्या सोबतीने लढा सुरू आहे. दोघांनी आतापर्यंत वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे खेटे घातले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. आता शेवटी त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार केला आहे.