बीड: प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या आरोपातून, मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याचे कपडे फाडून, त्याला गुलाल, शेंदूर फासून त्याची गावातून धिंड काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील आर्वी इथं सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी हस्तक्षेप करत, पीडित तरुणाची सुटका केली. प्रेम केल्याची चूक या तरुणाने केल्याने त्याला ही शिक्षा भोगावी लागली आहे.
आर्वी येथील 25 वर्षीय तरुणाचे वर्षभरापासून गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघे 25 एप्रिल रोजी औरंगाबादला पळून गेले. ते दोघे औरंगाबादमध्ये मित्राच्या घरी थांबले. त्याची कुणकुण लागल्याने, मुलीचे कुटुंबीय त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी दोघांनाही एका गाडीत घालून औरंगाबादबाहेर आणले. वाटेत त्यांनी त्या तरुणाला हाताने आणि चपलाने बेदम मारहाण केली.
मुलीला रस्त्यातच एका नातेवाईकाच्या घरी सोडले आणि तरुणाला घेऊन नारायणवाडी येथे आले. तरुणाला शेतातील झाडाल बांधून, जबर मारहाण केली. इतकंच नाही तर त्याच्या डोक्यावर आणि अंगावर गुलाल, शेंदूर फासून त्याला हलगी वाजवायला लावून, त्याची गावातून धिंड काढण्यात आली.