दौंडमध्ये डोक्यात दगड घालून युवकाची हत्या

0

पुणे – दौंड तालुक्यातील कासुर्डी गावातील एका युवकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ एका निर्माणाधीन इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही हत्या झाली आहे. गणेश झुंबर टेमगिरे (वय १९ वर्षे रा. भरतगाव, ता. दौड, जि. पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आदिनाथ विनायक जगदाळे वय २८ वर्षे रा. भरतगाव, ता. दौड) यांनी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

गणेश हा बुधवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी कासुर्डी टोलनाक्याच्या जवळ असलेल्या जगदाळे अपार्टमेंटमध्ये गणेशचा मृतदेह आढळला. गणेश जगदाळे याच्या डोक्यावर लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली असल्याचे घटनास्थळावरील प्रथमदर्शनी दृश्यातून स्पष्ट होत आहे.

गणेश याने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली होती. हत्येमागील कारण समजू शकले नसून यवत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.