एमपीएससी परीक्षेतील घोळ; नोकरीसाठी अहमदनगरच्या तरुणाचे कृत्य
मुंबई : जमिनीच्या मोबदल्यासाठी राज्य सरकारच्या लालफितशाहीशी लढा देणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर हादरलेल्या राज्य सरकारला अहमदनगरच्या तरुणाने बुधवारी जोरदार दणका दिला. राज्य सेवा परीक्षेच्या (एमपीएससी) पेपर तपासणीत घोळ असल्याने परीक्षा देऊनही नोकरी लागत नाही, म्हणून नैराश्य आलेल्या अविनाश शेटे (वय 25) या तरुणाने मंत्रालयाबाहेरच जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अविनाशने कृषी अधिकारीपदाची परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश वारंवार मंत्रालयाच्या फेर्या मारत होता. परंतु, त्याला कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याचे प्राण वाचविले. दिवसभर पोलिस त्याची कसून चौकशी करत होते.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाशला काहीही इजा झाली नसून, वेळीच धाव घेतल्याने तो पेटता पेटता वाचला आहे. थोडा जरी विलंब झाला असता तर अविनाशने आत्मदहन केले असते, असे पोलिसांनी सांगून, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मूळचा नगर येथील असलेल्या अविनाश शेटे याने सहाय्यक कृषी अधिकारीपदासाठी परीक्षा दिली आहे. त्याच्या परीक्षेचा निकाल लावण्यात एमपीएससीकडून विलंब होत आहे. वारंवार चौकशी करूनही काहीही उत्तर दिले जात नाही यामुळे तो वैतागला होता. रागाच्या भरात त्याने मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. परंतु, सुरक्षेस्तव नेमणुकीस असलेल्या पोलिसांनी वेळीच त्याला सावरले व त्याचे प्राण वाचविले. त्याला ताब्यात घेऊन त्याची उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती.
पोलिसांवर सुरक्षेचा ताण वाढला
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालय परिसरात तैनात पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण निर्माण झालेला आहे. अनेक नडलेले प्रकल्पग्रस्त आपल्या व्यथा घेऊन थेट मंत्रालयात येवून आपले गार्हाणे मांडत आहेत. तसेच, न्याय मिळत नसल्याने आत्मघाती पाऊले उचलत आहेत. गतआठवड्यातही एका तरुणाला कीटकनाशकाच्या बाटलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक उपेक्षित नागरिकदेखील न्याय मागण्यासाठी मंत्रालयात येत असून, त्यापैकी अनेकांनी स्थानिक पातळीवर पोलिसांना आत्महत्येचा इशारा दिलेला असतो. त्याची खबरही मंत्रालय पोलिसांना देण्यात आलेली असते. त्यामुळे तैनात पोलिस कमालीचे सतर्क असून, त्यांच्यावर चोवीस तांस सुरक्षेचा ताण निर्माण झालेला आहे.