भूषण कॉलनीतील दोघा भावंडांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

0

मित्रांच्या वादात पडणे भोवले ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव- मित्राचा वाद मिटविण्यासाठी मध्ये पडलेल्या भूषण कॉलनीतील राहूल सुरेश बोरसे 26 व त्याचा मोठा भाऊ सुमित बोरसे या दोघांवर पाच ते सहा तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 17 रोजी रात्री 11.15 वाजता गांधीनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल असून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

भूषण कॉलनीतील राहूल बोरसे याचा कॉलनीतीलच मित्र गणेश एकनाथ भोळे याचा 17 रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने राहूलसह त्याचा मोठा भाऊ सुमित व मित्र जमले होते. शतायू नावाच्या मित्राला रात्री 10.45 वाजता देवेन मनोहर चौधरी याचा फोन आला. डॉ. नवाल यांच्या गल्लीत दर्शन जैन यांच्या बरोबर भांडण झाल्याचे सांगितले. त्यानुसार राहूलसह सर्वजण देवेनकडे गेले.

जाब विचारताच दोवा भावंडावर हल्ला
डॉ. नवाल गल्लीत पोहचल्यावर याठिकाणी दर्शनचा शोध घेतला. तो व त्याच्यासोबत पाच जण गिलोरी नावाचा खेळ खेळत होते. त्याच्या घरासमोर जावून देवेन केलेल्या भांडणाचा जाब विचारला असता दर्शन तसेच त्याच्यासोबत पाच जणांनी राहूल याच्या पाठीमागे उजव्या बाजूने तर त्याचा मोठा भाऊ सुमित याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. व दोघेही पसार झाले. मित्रांनी दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दोघांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात राहूल बोरसे याच्या फिर्यादीवरुन दर्शन जैन याच्यासह 5 जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक करीत आहेत.

तीन जणांना अटक
दोघांवर प्राणघातक हल्लयात जखमी सुमित बोरसेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची गंभीर दखत घेत पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन शनिवारी दिवसभर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. गुन्ह्यातील संशयित गणेश नगरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सुरज पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी इतर कर्मचार्‍यासह सापळा रचून चेतन अनिल भालेराव वय 21, आकाश प्रकाश सपकाळे वय 21 व विजय देवेंद्र बाविस्कर वय 19 तिघे रा. विवेकानंद नगर या तिघांना अटक केली. एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त असून त्याच्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलीस उपअधीक्षकांची जिल्हापेठला भेट घेतल्याचे कळते.