विजयवाडा: आंध्र प्रदेशमध्ये जायंट किलर ठरलेले वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज गुरूवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल ई एस एल नरसिम्हन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन, तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची देखील उपस्थिती होती.आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.
शपथविधी सोहळ्याअगोदर राष्ट्रगीत झाले. या कार्यक्रमानंतर राज्यपाल ई एस एल नरसिम्हन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. जगमोहन रेड्डींनी एकट्यानेच शपथ घेतली, तर त्यांच्या मंत्रिमंडळाचे गठण ७ जून रोजी होण्याची शक्यता आहे. जगनमोहन रेड्डी यांनी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना देखील आपल्या शपथविधा सोहळ्यास आमंत्रित केले होते. जगन यांच्या वायएसआर काँग्रेसने राज्य विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. याशिवाय त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २२ जागांवर विजय मिळालेला आहे.
शपथविधीपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगनमोहन रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या.