अवंतिपोरा: सीमारेषेवर कुरघोडी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचण्यात भारतीय सुरक्षा पथकाला यश आले आहे. काश्मीरच्या अल-कायदा युनिटचा प्रमुख हामीद हमिद लेल्हारीला काल मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा पथकांनी ठार केले. झाकीर मुसाचा वारसदार म्हणून हामीद हमिद लेल्हारी ओळखले जायचे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या अन्सर गझवत उल हिंदने झाकीर मुसाच्या मृत्यूनंतरक हामीद लेल्हारीला नवीन कमांडर म्हणून घोषित केले होते.
झाकीर मुसा मे २०१९ मध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता. मंगळवारी संध्याकाळी अवंतिपोरामध्ये झालेल्या चकमकीत हमीद लेल्हारी आणि त्याचे दोन साथीदार ठार झाले. सुरक्षा पथकांना या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या भागाला घेराव घातला व शोध मोहिम सुरु केली.
अन्सर गझवत उल हिंदशी संबंधित असलेल्या तीन दहशतवाद्यांचा काल संध्याकाळी खात्मा केला. त्यापूर्वी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीतही तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी शुक्रवारी सकाळी श्रीनगरमध्ये दिली. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक तरुण दहशतवादाकडे न वळता शांतीच्या मार्गावरुन वाटचाल करतील तेव्हाच खरे यश मिळाले असे म्हणता येईल. अन्सर गझवत उल हिंद गटाचा खात्मा केल्याचा दावा दिलबाग सिंह यांनी केला.