सुनावणी अंती जिल्हाधिकार्यांनी दिला निकाल
जळगाव – येथील जिल्हा परीषदेच्या दोन सदस्यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही म्हणून अपात्र करण्यात आल्याची कारवाई जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अॅड. हरूल देवरे यांनी दिली. दरम्यान या कारवाईमुळे जिल्हा परीषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यात एक सदस्य काँग्रेस तर दुसरे शिवसेनेचे सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत विधी अधिकारी अॅड. हरूल देवरे यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम सुपडू कोळी हे सन २०१७ मध्ये वाघोदा-विवरा गटातून अनुसूचित जमाती प्रवर्गातुन निवडून आले होते. निवडणूकीवेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्यांच्यकडून खुलासा देखिल मागविण्यात आला होता. आत्माराम कोळी यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव प्रलंबीत असल्याचा खुलासा सादर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दि. २१ जून पुर्वी जात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत ग्रामविकास विभागाने परिपत्रक जारी केले होते. तरी देखिल आत्माराम कोळी यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणून पाल येथील गोमती सिताराम बारेला यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे काल दि. ८ रोजी सुनावणी झाली. सुनावणी अंती जिल्हाधिकार्यांनी काँग्रेसचे आत्माराम सुपडू कोळी यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. तसेच दुसर्या प्रकरणात हतनुर-तळवेल गटातील अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातुन निवडून आलेल्या शिवसेनेच्या जि.प. सदस्या सरला अनिल कोळी यांनी देखिल जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. यासंदर्भात प्रकाश रामचंद्र मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. मात्र जात पडताळणी समितीने सरला कोळी यांचे वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. त्याला सरला कोळी यांनी औरंगाबाद खंडपीठात रीट दाखल करून आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी अशी विनंती सरला कोळी यांनी केली होती. मात्र ही विनंती नामंजूर झाली असुन जिल्हा परीषद सदस्या सरला कोळी यांच्यावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.
जिल्हा परीषदेत खळबळ
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज एकाच दिवशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परीषदेच्या दोन सदस्यांना अपात्र केल्याची कारवाई केली. या कारवाईची वार्ता जिल्हा परीषदेपर्यंत पोहोचली आणि जिल्हा परीषदेत मोठी खळबळ उडाली आहे.