पालकमंत्र्यांकडे वेळ नसल्याने शिक्षक पुरस्काराच्या घोषणेला विलंब
जळगाव: मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त हुकला आहे. यादीतील गोंधळामुळे पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा होऊ शकले नसल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लांबल्याचे खरे कारण आहे. मात्र जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुरस्कार वितरणाच्या कार्क्रमाला उपस्थित राहण्यासाठी वेळ नसल्याने शिक्षक दिनी पुरस्कार वितरण होऊ शकले नसल्याचा सूर जि.प.पदाधिकारी आणि अधिकार्यांमध्ये उमटत आहे. मागील वर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जि.प. ’आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मात्र शिक्षकदिनी पुरस्कार वितरीत करण्यात आले नव्हते. यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा होऊ शकली नसल्याने अर्थातच पुरस्कार वितरण होऊ शकले नाही. मात्र पुरस्कार वितरणाला उपस्थित राहण्यास पालकमंत्र्यांकडे वेळ नसल्याचा खापर गिरीश महाजन यांच्यावर फोडले जात आहे.
विविध घोटाळ्यातील शिक्षकांची शिफारस
गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक पुरस्काराची घोषणा व्हावी यासाठी शिक्षण समितीच्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. मात्र ठरावाचा कोठेही विचार न करता मर्जीतील नावांची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. येवढेच नाही तर गणवेश घोटाळा, पोषण आहार घोटाळ्याप्रकरणी ज्यांच्यावर आरोप आहे अशा शिक्षकांची देखील शिक्षक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या गोंधळामुळेच पुरस्काराची घोषणा करण्यास विलंब होत आहे.
यादीबाबत टोलवाटोलवी
शिक्षक पुरस्काराच्या घोषणेबाबत शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, शिक्षणाधिकारी डी.एम.देवांग यांना विचारणा करण्यात येत आहे. यावर त्यांच्याकडून तांत्रिक बाबींमुळे यादी जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र गुरुवारी पुन्हा शिक्षणाधिकारी देवांग यांना यादीबाबत विचारण्यात आली असता, त्यांनी यादी जाहीर झाली असून जि.प.अध्यक्षांकडे यादी पाठविण्यात आली असल्याचे सांगितले. यादीची घोषणा अध्यक्षा करतील असे देवांग यांनी सांगितले. मात्र अध्यक्ष कार्यालयाकडून यादी न मिळाल्याचे सांगण्यात आले. यावरून पुरस्काराच्या यादीवरून टोलवाटोलवी केली जात असल्याची दिसून येते.
पदाधिकार्यांमध्ये वाद
शिक्षक पुरस्कारासाठी मर्जीतील नावे समाविष्ट करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केले आहेत. यावरून जिल्हा परिषदेच्या दोन पदाधिकार्यांमध्ये वाद देखील झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुरस्कारातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला देखील पुरस्काराच्या घोषणेवरून वाद सुरु असल्याने यादी जाहीर करण्यात विलंब होत झाल्याचे बोलले जात आहे. गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कारार्थीची निवड व्हावी यासाठी सभेत ठराव करण्यात आला मात्र वादामुळे ठरावाची कोठेही अंमलबजावणी होतांना दिसले नाही.