झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि टीम सस्पेंड; यापुढे क्रिकेट खेळणार नाही

0

दुबई: लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक घेण्यात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले. तसेच सरकारी हस्तक्षेप मोडून काढण्यातही त्यांना अपयश आले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि संघाचे तात्काळ निलंबन करत असल्याची घोषणा आयसीसी केली. आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे आयसीसीकडून कोणताही निधी मिळणार नाही. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाला सहभागी होता येणार नाही. ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खेळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवले पाहिजे. कोणत्याही सदस्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय गंभीर आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या घटनेचे उल्लंघन केले आहे. ते अनियंत्रित पद्धतीने कायम ठेवण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले.